(राजगुरूनगर, प्रतिनिधी ) अफजलखानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण म्हणजे लँड जिहादच होते. हे अतिक्रमण म्हणजे अफजल खानाचे उदात्तीकरण होते. त्याचे वंशज जिवंत असल्याचे ते पुरावेच होते. त्यामुळेच ते अतिक्रमण दूर केले,” असे प्रतिपादन वन व सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार त्यांनी केले.
प्रतापगड उत्सव समिती तर्फे प्रतिवर्षी शिवप्रताप दिनाचे औचित्य साधत विविध पुरस्कारांचे वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी झालेल्या भरगच्च कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथपंत बोकील पुरस्कार’ राजगुरूनगर येथील प्रसिद्ध ॲड. निलेश आंधळे यांना वन व सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सोन्याचे कडे, सन्मान चिन्ह,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रतिवर्षी देश,देव,धर्म कार्यात विशेष कामगिरी करणाऱ्या वकिलांना हा पुरस्कार दिला जातो. प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमबजावणीसाठी ॲड. निलेश बाळासाहेब आंधळे यांनी प्रशासनात तसेच न्यायालयात लढा दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी त्यांनी पुरस्कार्थीना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखिल दिल्या.छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला, तो दिवस म्हणजे शिवप्रताप दीन या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “औरंगजेब किंवा अफजल खानाकडे काही लोक विशिष्ट धर्माचे म्हणून पाहतात. ते कोणत्याही धर्माचे नव्हते, त्यांचा धर्म फक्त राक्षसीच होता. आम्ही देखील कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही हा देश जातीच्या आधारावर नाही, तर सदाचारावर चालवतो, ” असे मुनगंटीवार म्हणाले. “छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणणारच,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी एअर व्हाइस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, शहराध्यक्ष धीरज घाटे, शरद मोहोळ आदी प्रमूख पाहुणे उपस्थित होते.“शिवप्रताप दिनाचा उत्सव संपूर्ण देशभरात आणि लाल किल्ल्यावर देखील साजरा झाला पाहिजे,” अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी प्रास्ताविकात केली. शाहीर कामथे यांनी सहकाऱ्यांसह पोवाडा सादर केला. व्याख्याते सौरभ कर्डे यांनी शिवप्रताप दिन प्रसंगावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदू एकबोटे यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष संजय भोसले यांनी केले.
“या पुरस्काराने माझी व माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी दुप्पटीने वाढली असून या पुरस्काराचे श्रेय माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आई,वडील, कुटुंबीय तसेच मिञ परिवार यांचे आहे. आज पासून दररोज २ तास अधिक काम करण्याचा संकल्प करणार आहे.”
ॲड. निलेश बाळासाहेब आंधळे(मानद पशुकल्याण अधिकारी, नियुक्ती मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासन कमिटी)