
बातमी 24तास (प्रतिनिधी ) शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत सुमारे १७ लाख ९१ हजार रुपये किंमतीचे १६३ ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. या कारवाईत एक दुचाकी, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे व पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर यांनी शहरातील अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार व सहायक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.१८ वाजण्याच्या सुमारास चिखली येथील वडाचामळा, जाधववाडी परिसरात पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. सार्वजनिक रस्त्यावर संशयित अवस्थेत उभ्या असलेल्या होंडा डिओ (क्र. एमएच ०३ सीवाय ९०३९) या दुचाकीवरील फैजान झहीर अहमद शेख (वय २५, रा. चिखली) याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून १६३ ग्रॅम ०६ मिलीग्रॅम वजनाचा एमडी (मॅफेड्रोन) जप्त करण्यात आला.चौकशीत त्याने हा अंमली पदार्थ मुंबईतील मोहम्मद अली मोहम्मद शरीफ शेख ऊर्फ बाबू व खलील खान यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. यानंतर मुंबई येथे तपास पथक पाठवण्यात आले. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी चेंबूर परिसरातून मोहम्मद अली शेख ऊर्फ बाबू याला ताब्यात घेण्यात आले. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ९८/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण,पोउपनि स्वामीनाथ जाधव, सपोफौ शकुर तांबोळी, पोलीस अंमलदार विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्पे, जावेद बागसिराज, निखिल शेटे, सुषमा पाटील, सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, रणधीर माने, कपिलेश इगवे, चंद्रकांत जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे सुभाष गुरव, प्रकाश ननावरे यांचे मदतीने यशस्वीपणे पार पाडली. शहरात अंमली पदार्थांविरोधात अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
