
बातमी 24तास
चाकण (वृत्त सेवा) चाकण नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी मालमत्ता कर 31 डिसेंबर 2025 पर्यंत भरावा, अन्यथा थकबाकीवर २ टक्के व्याज आकारले जाईल, असे निर्देश चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र हे चाकण शहरातील नागरिकांना मान्य नसल्याने चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याला तीव्र विरोध करण्यात आला आहे.
नागरिकांच्या कौटुंबिक, आर्थिक तसेच व्यवसायातील अडचणींचे गांभीर्य लक्षात घेता, मालमत्ता कर भरण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.यावेळी बोलताना चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रामशेठ गोरे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांवर सध्या आर्थिक संकट आहे. अशा परिस्थितीत कर भरण्यासाठी घाई करून व्याज लावणे अन्यायकारक आहे. जर नगरपरिषदेने सदर आदेश रद्द केला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.या निवेदनाच्या वेळी अल्पसंख्यांक अध्यक्ष मुबीनभाई काझी, नगरसेवक किशोर जगनाडे, ज्येष्ठ नेते अनिल शेठ देशमुख, शांताराम बापू आगरकर, युवा नेते सचिन दादा पानसरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.