
बातमी 24तास,चाकण प्रतिनिधी, (कमलेश पठारे):खेड तालुक्यात सध्या युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया खत उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना किमान दहा-दहा खत दुकानांमध्ये हेलपाटे मारावे लागत असून, अनेक ठिकाणी खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
तालुक्यात प्रचंड प्रमाणात युरिया खताची मागणी असताना पुरवठा मात्र अपुरा ठरत असल्याचे चित्र आहे. काही मोजक्या दुकानांमध्ये युरिया शिल्लक असला तरी तेथेही दुप्पट किमतीने खत विकले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. यामुळे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चाचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.राजगुरुनगर, चाकण, शेल पिंपळगाव, काळुस, पाईट आदी भागांतील शेतकरी या तुटवड्याचा सर्वाधिक फटका सहन करत असून, पिकांची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेवर खत न मिळाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे.दरम्यान, युरिया खताचा साठा, वितरण व्यवस्था आणि दर यावर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, खत विक्रेत्यांवर योग्य नियंत्रण ठेवावे तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेसा व योग्य दरात खत पुरवठा सुरळीत करावा, अशी ठाम मागणी खेड तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.