
बातमी 24तास चाकण (वृत्त सेवा) –चाकण वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण तळेगाव चौक, माणिक चौक तसेच शहरातील इतर प्रमुख चौकांत विशेष वाहतूक तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.या मोहिमे दरम्यान दुचाकी वाहनचालक हेल्मेटचा योग्य वापर करताना व तसेच ज्या चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्ट लावले व आवश्यक कागदपत्रे (परवाना, विमा, पीयूसी) सोबत बाळगताना आढळून आले. अशा नियमपालन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांचा चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे व वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी पुष्प देऊन सन्मान केला.

यावेळी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व, हेल्मेट वापरामुळे होणारी सुरक्षितता, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नियमांचे पालन केल्यास स्वतःचे तसेच इतरांचेही प्राण सुरक्षित राहतात, असा संदेश यामधून देण्यात आला.चाकण वाहतूक विभागाच्या या सकारात्मक व प्रेरणादायी उपक्रमाचे वाहनचालकांकडून स्वागत करण्यात आले असून, अशा जनजागृती मोहिमांमुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.