
बातमी 24तास
चाकण प्रतिनिधी ( कमलेश पठारे) बिरदवडी–महाळुंगे रस्त्यावरील आरूवस्ती परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर गंभीर परिणाम झाला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या आणि खोली इतकी वाढली आहे की संपूर्ण रस्ता तळ्याचे स्वरूप धारण करतोय. त्यामुळे वाहनचालकांसमोर मोठा धोका निर्माण झाला आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते, त्यामुळे रस्त्यावर खड्डा आहे की पाण्याचा डबका, हे ओळखणेच कठीण जाते.


अनेक दुचाकीचालकांनी अचानक खड्ड्यात घसरून अपघात झाल्याची माहिती दिली. काही अपघातांमध्ये चालक जखमीही झाले असून तरीही प्रशासनाकडून कोणतीही तातडीची दखल घेतलेली नाही.नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने आजतागायत रस्ता दुरुस्त करण्यासाठी कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून येते. रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध, महिला, विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूकही अनियमित झाली असून छोटी वाहने तर मार्ग काढताना अक्षरशः धडपड करताना दिसतात.स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “दररोज एखादा तरी अपघात होतोच. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दुचाकी चालवणे म्हणजे जोखीम. दोन महिन्यांपासून आम्ही तक्रारी करत आहोत, पण प्रशासनाचे कानाडोळे सुरू आहेत,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.वाढत्या अपघातांमुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी आता अधिकच तीव्र होत आहे. नागरिकांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले असून परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी आहे.