
बातमी 24तास
राजगुरूनगर (प्रतिनिधी, प्रभाकर जाधव)
“जे काम प्रशासनाने करायचे ते नागरिकांना करावे लागते, ही खरोखरच प्रशासनाची उदासीनतेची स्पष्ट दिसत आहे,” असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत. अशीच परिस्थिती भांबोली (ता. खेड) येथे दिसून आली. श्रीशा लँडमार्क व श्रीशा क्रेन सर्व्हिसचे सर्वेसर्वा, युवा उद्योजक संदेश काळे यांनी प्रशासनाची मदत न मागता स्वतःच्या खर्चाने चाकण–वासुली फाटा रस्त्यावर असलेले खड्डे बुजवून नागरिकांची मोठी समस्या दूर केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चाकण वासुली फाटा रस्ता ते सुरीन कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. हा मार्ग पुढे सावरदरी येथील ठाकरवस्तीला जातो. त्याचप्रमाणे भांबोली व सावरदरी येथील शेतकरी, कामगार आणि लहान-मोठे उद्योगधंदे या रस्त्याशी जोडलेले आहेत. पण रस्त्याची दुरवस्था इतकी बिकट झाली होती की, पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून दुर्गंधी पसरत होती. नागरिक व वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन संदेश काळे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चाने मुरूम टाकून, रोलिंग करून हा मार्ग प्रवासयोग्य केला. त्यामुळे वाहतुकीस सुलभता तर आलीच, पण गटाराच्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीपासूनही नागरिकांची सुटका झाली.या कामावेळी संदेश काळे यांच्यासह मयूर काळे, रवींद्र शिळवणे, हृतिक बुट्टेपाटील, प्रशांत बुट्टेपाटील उपस्थित होते.संदेश काळे यांनी प्रशासनाची वाट न पाहता घेतलेला हा पुढाकार इतरांसाठी आदर्श ठरेल, असे नागरिकांचे मत आहे.
“आजूबाजूच्या कंपन्यांत काम करणाऱ्या कामगारांचा प्रवास सुखकर झाला असून, गावातील मुलांना शाळेत जाण्यासाठी आता अडचणी येणार नाहीत,” असे एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितले.स्थानिक नागरिक, शेतकरी व उद्योजकांनी संदेश काळे यांच्या सामाजिक जाणीवेबद्दल मनापासून कौतुक व्यक्त केले आहे.
