
बातमी 24तास
( मंचर प्रतिनिधी,विकास सुपेकर )
कुकडी प्रकल्पातील सर्व धरणांमध्ये (डिंभे, वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगे, चिलेवाडी, येडगाव) मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने आणि पावसाचे प्रमाण वाढल्याने नदीपात्रात होणाऱ्या विसर्गात वाढ करण्याबाबत कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळपासूनच धरणांमध्ये येणाऱ्या आवक प्रमाणात वाढ होत असून पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गात आणखी वाढ होऊ शकते. हवामान खात्याने 28 व 29 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्कतेचा सल्ला दिला आहे.सद्यस्थितीत धरणांचे पाणीपातळी व विसर्ग पुढीलप्रमाणे आहे :• डिंभे धरण – 100% भरले, एकूण विसर्ग 25,270 क्यूसेक• वडज धरण – 100% भरले, एकूण विसर्ग 12,000 क्यूसेक• पिंपळगाव जोगे धरण – 93.9% भरले, एकूण विसर्ग 2,780 क्यूसेक• येडगाव धरण – 100% भरले, एकूण विसर्ग 5,700 क्यूसेक• चिलेवाडी धरण – 99.30% भरले, एकूण विसर्ग 1,100 क्यूसेक• माणिकडोह धरण – 76.93% भरले, सांडव्यावरून सध्या विसर्ग शून्य क्यूसेककुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणातील येव्यानुसार नदीपात्रात होणारा विसर्ग वेळोवेळी कमी–जास्त केला जाईल, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील तलाठी, पोलीस पाटील, सरपंच तसेच नागरिकांना सुचित करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकिनारी ठेवलेली शेती अवजारे, पाण्याचे पंप, जनावरे किंवा अन्य साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्व नागरिकांनी प्रशासन व जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, अशी विनंती पाटबंधारे विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
