
बातमी 24तास
राजगुरूनगर (प्रतिनिधी प्रभाकर जाधव.)
गेल्या दोन दिवस बरसत असणाऱ्या पर्जन्य वृष्टीमुळे धामणे येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या परिस्थितीमुळे कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, मुंबई–तळेगाव या ठिकाणी जाणारे प्रवासी व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पावसामुळे पुलावरून पाणी ओसंडून वाहत असून वाहनचालक व पादचारी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने अद्याप या ठिकाणी पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, दररोज नोकरीसाठी बाहेर जाणारे कामगार वेळेत कंपन्यांमध्ये पोहोचू शकत नाहीत. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असून अनेक ठिकाणी शाळा-कॉलेज गाठणे कठीण झाले आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलावरून पाणी वाहणे हा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो.तरीसुद्धा प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही.
“आमचा बाहेरील गावांशी संपर्क पूर्णपणे तुटतो, अशा वेळी तात्पुरत्या मार्गाची व्यवस्था करणे किंवा पुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे,” अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.संपर्क तुटल्यामुळे व्यापारी वर्ग, रुग्णांना उपचारासाठी नेणे आणि आपत्कालीन सेवा यांनाही मोठा फटका बसत आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक अध्यक्ष, जयसिंग दरेकर यांच्या समवेत सर्व स्तरातून प्रतिपादन होत आहे.
