

सव्वाशे कोटींच्या निधीवरून आजी माजी आमदारांमध्ये जोरदार सोशल मीडिया वॉर
विकासकामांमध्ये राजकारण नको;तालुक्यातील जनतेकडून आवाहन
बातमी 24तास ( विशेष प्रतिनिधी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील रस्त्यांसाठी तब्बल सव्वाशे कोटींहून अधिक निधी प्राप्त झाला आहे.परंतु हा निधी आपल्यामुळेच आला असल्याचे दावे-प्रतिदावे करत आजी माजी आमदारांमध्ये जोरदार सोशल मीडिया वाॅर सुरू झाले आहे.
श्रेय कुणीही घ्या ! परंतु तालुक्यातील मूलभूत प्रश्न सोडवा असे आवाहन जनतेकडून केले जात आहे. खेड तालुक्यातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले.पीएमआरडीएचे प्रमुख, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आयुक्त यांच्याकडे नियमित पाठपुरावा केल्यानेच हा निधी प्राप्त झाल्याचा दावा विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले.तर माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सातत्याने अर्थमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळेच हा निधी उपलब्ध झाल्याचे स्पष्ट केले.यामुळे दोघांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे.मात्र या निधीमुळे प्रचंड खड्डेमय रस्त्यांची स्थिती थोडीफार तरी सुधारेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तेच्या बाजूने निकाल लागला असला तरी याला खेड तालुका अपवाद ठरला कारण पहिल्यांदाच सत्तेच्या विरोधातील बाबाजी काळे हे तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले.निवडणुकीच्या निकालापासून आजी – माजी आमदारांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. मंत्रीपदाची संधी असताना हा पराभव झाल्याची सल दिलीप मोहिते पाटील व त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आहे.तर आपल्याला सर्वसामान्य लोकांनी निवडून दिल्याने तालुक्यातील जनता आपल्या पाठीशी असल्याचे आमदार बाबाजी काळे हे सांगत आहेत.अनेक ठिकाणी दोन्ही आजी- माजी मध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे.
राज्यात महायुतीतीची सत्ता असल्याने पदावर नसताना माजी आमदार यांचा तालुक्यातील दबदबा अजूनही कायम आहे.परंतु बाबाजी काळे यांना जिल्हा परिषद प्रशासनाचा चांगला अनुभव असल्याने प्रशासकीय, पक्षीय पातळीवर पाठपुरावा करत सत्तेत नसताना निधी मिळविण्यात यश येत आहे.माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आमदार बाबाजी काळे यांच्या निवडणुकीच्या विरोधात याचिका दाखल केल्याने अंतर्गत वाद अधिकच वाढले आहेत.याचेच पडसाद नुकताच तालुक्यासाठी पीएमआरडीएकडून निधी मंजूर झाला त्याचे श्रेय घेण्यासाठी आजी – माजी आमदारांसह कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर जोरदार चढाओढ लागली.आजी माजी आमदारांमध्ये सुरू असलेल्या या शीतयुद्धाची चर्चा मात्र तालुक्यात सुरू आहे.
आजी – माजी आमदारांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील रस्त्यासाठी तब्बल सव्वाशे कोटींपेक्षा अधिक निधी मजुर झाला आहे.निकृष्ट दर्जाचे काम व पावसामुळे तालुक्यातील बहुतेक सर्व रस्त्यांची अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे. पीएमआरडीएच्या या निधीमुळे किमान काही रस्ते खड्डेमुक्त होतील अशी अपेक्षा आहे. परंतु आजी- माजी आमदार यांच्यामध्ये सुरू असल्येल्या या शीतयुद्धाचा परिणाम रस्त्यांच्या कामावर होऊ नये अशी अपेक्षा मात्र सर्वसामान्य जनतेची आहे.
दिलीप मोहिते पाटील,माजी आमदार. :- खेड तालुक्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रस्त्यांसाठी हा निधी मिळाला आहे.
बाबाजी काळे,आमदार. खेड तालुका :- तालुक्यातील काही रस्त्यांसाठी ११८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.हा निधी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्या सहकार्यातून आणि माझ्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे.
