
बातमी 24तास
चाकण प्रतिनिधी(अतिश मेटे ) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या आदेशानुसार, चाकण शहर हद्दीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेली अतिक्रमणविरोधी मोहिम दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली. सुमारे 100 अनधिकृत मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पुणे–नाशिक महामार्गावर करण्यात आली असून, या मोहिमेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), चाकण नगर परिषद व पोलीस प्रशासन यांचा समावेश होता.


या संयुक्त कारवाईत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे रवी रांजणे व त्यांचे पथक, चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व त्यांचे संपूर्ण पथक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शिंदे व त्यांचे पथक तसेच पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे, शेड्स, फलक, पत्रे व इतर अडथळे हटविण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोकळा श्वास मिळाल्याने वाहतुकीचा प्रवाह सुकर झाला आहे. त्यामुळे चाकण शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतुकीच्या समस्येला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले की, रस्त्यावर केलेली अतिक्रमणे स्वतःहून हटवावीत. तसेच अनधिकृत मालमत्ता असणाऱ्या नागरिकांनी त्या मालमत्ता गुंठेवारी अधिनियमांतर्गत नियमित करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. प्रशासन कारवाईसह लोकजागृतीवरही भर देत असून, नागरिकांनी सहकार्य केल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेतील अडचणी कायमस्वरूपी सुटतील, असेही ते म्हणाले.या कारवाईमुळे चाकण शहरात वाहतूक कोंडी कमी होऊन शिस्तबद्ध वाहतुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
