
बातमी 24तास चाकण (प्रतिनिधी,आतिश मेटे) : पुणे–नाशिक महामार्गाला लागून असलेल्या आंबेठाण चौकाजवळील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. पाण्याखाली खड्डे दिसत नसल्याने वाहनं अडकण्याचे प्रकार वाढले असून, लहान–मोठे अपघात घडत आहेत.रस्त्याच्या कडेला योग्य ड्रेनेज लाईन नसल्याने पावसाचे पाणी तसेच सगळा घाण कचरा रस्त्यावर साचतो. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, महामार्गावरील वळण घेणारी वाहने या दुय्यम रस्त्यावरून जाताना मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. सततच्या वाहनांच्या गर्दीमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि अडथळ्यांचा थेट फटका नागरिक, व्यापारी व कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसत आहे.
नागरिकांचे अनुभव :- गेल्या आठवड्यात माझ्या दुचाकीचे चाक खड्ड्यात अडकले. थोडक्यात मोठा अपघात टळला. रोज असेच सुरू राहिले तर कुणाचा तरी जीव जाणार असे स्थानिक तरुण निखिल शेवकरी यांनी सांगितले. “खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने ते दिसतच नाहीत. वाहनं अडकतात, त्यात व्यापाऱ्यांना मालवाहतुकीत मोठी अडचण निर्माण होते,” अशी व्यथा स्थानिक व्यापारी हितेश साळुंखे यांनी व्यक्त केली.
नागरिकांचे आवाहन : “दरवर्षी पावसाळा आला की हा रस्ता जीवघेणा ठरतो. खड्ड्यांमुळे गाड्या अडकतात, अपघात होतात. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून खड्डे बुजवावेत, ड्रेनेज लाईनची सोय करावी,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिक पातळीवर रस्ता दुरुस्तीची तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिक तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेकडे इतके बेफिकीर का आहे? अपघात झाल्यानंतरच उपाययोजना होणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
