
बातमी 24तास
चाकण,प्रतिनिधी(योगेश गायकवाड)
चाकण परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडी, अपुरी रस्ते सुविधा आणि नागरिकांच्या तीव्र संतप्त प्रतिक्रिया आणि त्याबाबत बातमी 24तास ने वारंवार प्रसिद्धी देऊन चाकणकर नागरिकांच्या भावना संबंधित अधिकारी विभागाकडे पोहोचविल्या.या प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेऊनअखेर पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण जागे झाले आहे. चाकणकरांच्या आंदोलनात्मक आणि आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने पावले उचलायला सुरुवात केली असून, पीएमआरडीए ने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी रस्त्याच्या कामासंदर्भातील ई-निविदा प्रसिद्ध केली आहे.या निविदेद्वारे तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर (देहू-येळवडी मार्ग) राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वर मध्यवर्ती विभाजक असलेले अनेक पदपथासह सिमेंट काँक्रिट रस्ते व पदपथाचे काम करण्यात येणार आहे. हे काम मध्यवर्ती दगडी कमानी पूल व आरसीसी पूल (एम डी आर १६१ मार्गावरील) पासून पुढे होणार आहे.ही निविदा प्रक्रिया अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम पद्धतीने (ई पी सी पद्धत) राबवली जाणार आहे. १४ जुलै २०२५ पासून सकाळी ११ वाजल्यापासून www.mahatenders.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावरून निविदा दस्तऐवज डाउनलोड करता येतील. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. पीएमआरडीए चा हा निर्णय चाकण परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीचा आणि आंदोलनांचा मोठा विजय मानला जात आहे. चाकण एमआयडीसी आणि परिसरातील अवजड वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अपुऱ्या रस्त्यांच्या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते. मात्र अलीकडील काळात नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे अखेर पीएमआरडीए ला या दिशेने ठोस पावले उचलावी लागली.