
बातमी 24तास
राजगुरुनगर प्रतिनिधी – खेड येथील सत्र व जिल्हा न्यायाधीश श्री. एस पी. पोळ यांचे न्यायालयाने साडे सहा वर्षांपूर्वी चालत्या एस टी. बस मध्ये घडलेल्या संवेदनशील खून खटल्यात विशेष सरकारी वकील सागर कोठारी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी अजित भगवान कान्हुरकर वय ४० रा. दावडी यांस दोषी धरून जन्मठेपेची आणि दंडाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणी हकीकत अशी कि, आरोपी अजित भगवान कान्हूरकर याचे मामाचे मोठ्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते मात्र सदर एकतर्फी प्रेम प्रकरणास मुलीचा आणि तिचे कुटुंबियांचा त्यास विरोध होता, अनेकवेळा समजावून देखील अजित मुलीला व तिचे कुटुंबाला त्रास देत होता म्हणून अजित विरुद्ध अनेक पोलीस तक्रारी झाल्या. अजित त्यामुळे चिडून होता आणि त्याच रागापोटी मामाचे खानदान संपवायचे ह्या उद्देशाने दि. १२/०६/२०१८ रोजी पाळत ठेवून तो मामाचा मुलगा ज्या बसने शाळेत जातो त्या बस मध्ये आधीच जावून बसला. मयत मुलगा श्रीनाथ खेसे सकाळी ७.२० वाजता बस मध्ये बसल्यानंतर बस खेसे वस्तीतून ५०० मीटर पुढे गेल्यावर दबा धरून बसलेल्या आरोपी अजितने मयताचे बहिणीसमोर श्रीनाथ वर चालत्या बसमध्ये पाठीमागून सपासप डोक्यात कोयत्याने १८ वर केले त्यात मयताच्या मेंदूचा अक्षरशः भुगा झाला आणि तो जागेवरच मृत्यू पावला.
सदर प्रकरणी बस पुढे पोलीस स्टेशनला नेवून मयताचे चुलते शिवाजी खेसे ह्यांनी तक्रार दिली.सदर प्रकरणी संपूर्ण गाव दोन दिवस बंद ठेवण्यात आले तर दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच सदर प्रकरणातील ओळख परेड पंचनामा हा देखील मिसिंग होता, त्यामुळे सदरचे प्रकरण हे अत्यंत संवेदनशील झाले होते.सन २०२० दरम्यान अॅड सागर कोठारी ह्यांची विशेष सरकारी वकील म्हणून सदर प्रकरणात नेमणूक झाली आणि सहाय्यक अॅड नारायण पंडित, अॅड विनया जगनाडे यांनी मिळून सदर प्रकरणात एकूण १६ साक्षीदार तपासले त्यापैकी प्रमुख प्रत्यक्षदर्शी एस टी. बस वाहक आणि मयताची लहान बहिण यांची साक्ष महत्वाची ठरली. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, प्रदीप जाधव यांनी सदर प्रकरणी तपास केला तर न्यायालयीन कामकाजात पोलीस कर्मचारी विजय चौधरी आणि खरात ह्यांनी सहभाग नोंदविला.दि. ०७/०२/०२०२५ रोजी न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविल्यानंतर सरकारपक्षातर्फे वकिलांनी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती, त्यावर सोमवारी दि. १०/०२/२०२५ रोजी न्यायालयाने सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून आरोपी कान्हुरकर यांस आजन्म जन्मठेपेची शिक्षा आणि दंड रक्कम रुपये १,००,०००/-अशी शिक्षा सुनाविली आहे.