शिवछत्रपतींच्या पादुकांचे शिवनेरीहून झाले दिमाखात प्रस्थान

Share This News

शिवरायांच्या राजाभिषेकाच्या ३५० व्या वर्षाच्या मुख्य सोहळ्यात जुन्नरकर होणार सहभागी

बातमी 24तास Web News Portal (जुन्नर, प्रतिनिधी )

भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेने आज प्रस्थान केले. श्रीशिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर, मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी शिवाई देवीची महापूजा बांधून, महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडाच्या दिशेने प्रतिकात्मक हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला. प्रस्थान समयी श्री शिवाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विकास दुराफे सर व ज्येष्ठ विश्वस्त प्रकाशनाना ताजणे आदी उपस्थित होते.शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, वढू बुद्रुक, थेऊर, वडकी मार्गे श्रीशंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या सासवड परिसरात विसावा घेतील. उद्या ज्येष्ठ शुद्ध द्वादशीस दुर्ग पुरंदरी शंभुराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करुन पुढे राजाभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोहोचतील. राज्यात गेल्या तीन वर्षांत असलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात प्रस्थान सोहळा पार पडला. यावर्षी शिवरायांच्या राजाभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने शासनाने आयोजित केलेल्या मुख्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जुन्नरमधील शिवभक्तही मोठ्या संख्येने रायगडाकडे रवाना झाले. नाशिकच्या येवल्या तालुक्यासह राज्यभरातून आलेले शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुका घेऊन, प्रस्थान पूजा करुन नारायणगाव मार्गे तालुक्यातून पुढे गेले. श्रीशिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ. संदीप महिंद गुरुजी याप्रसंगी बोलताना म्हणाले, कोरोनाचे बिकट संकट असतानाही आपल्या नियमित प्रथा-परंपरा जपताना गेली तिन्ही वर्षी शिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता. *आषाढी वारीत पायी चालण्याची परंपरा अखंडितपणे जपलेला हा शिवरायांचा पालखी सोहळा जगातील एकमेव ऐतिहासिक सोहळा आहे.* शासकीय निर्बंधांचा सामना करत घरी थांबलेले, पायी चालीची परंपरा खंडित झालेले जर मोठ्या संख्येने आता बाहेर पडत असले तरी यावर्षी वाढलेल्या तापमानामुळे निर्माण झालेले उष्माघाताचे संकट टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचा आग्रह त्यांनी याप्रसंगी केला.आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. राजाभिषेकापासून पुढील ३ दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वद्य द्वितीयेला श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर पुढील साडे दहा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. *शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ९ वे वर्ष तर परंपरेचे २९ वे वर्ष आहे.*शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी अजय शिंदे, डॉ. श्रवण अरबोळे, हभप साहिलबुवा शेख, संकेत गायकवाड, कृष्णा भोसले, वेदांत रणसिंग यांच्या गटाला मिळाली आहे. सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर संदीप ताजणे, अभिजित शेटे, हर्षवर्धन कुर्हे, अक्षय कुटे, तेजस शिंदे, शिवराज संगनाळे, दुर्गेश जोशी यांनी सक्रीय सहभाग घेत परिश्रम घेतले. तर आवश्यक त्या व्यवस्था उभ्या करण्यासाठी शिवाई देवीचे पुजारी सोपानजी दुराफे, शिवाई देवी मंदिर ट्रस्ट, कुसूरचे सरपंच व ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy