त्र्यंबकेश्वर मध्ये संदल मिरवणुकी दरम्यान धूप दाखविण्याच्या प्रकरणाचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’.

Share This News

बातमी 24तास Web News Portal

( नाशिक, प्रतिनिधी ) : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल मिरवणुकीदरम्यान धूप दाखविण्याच्या प्रकरणाला धार्मिक व राजकीय वळण लागल्याने वातावरण ढवळून निघाले असतानाच, त्र्यंबकेश्वरमध्ये बुधवारी नाट्यमय घडामोडी घडल्या.

नगरपरिषदेतील नेतेमंडळींसह समस्त ग्रामस्थांनी एकत्रित बैठक घेऊन सामंजस्य आणि एकोप्याची भूमिका घेतली. सर्वच प्रमुख नेत्यांनी धूप दाखविण्याची परंपरा पूर्वापार असून, यापूर्वी कधीही अनुचित प्रकार घडला नसल्याचे जाहीर सांगितले. शहरात कुठलीही जातीय तेढ नाही असे निक्षून सांगतानाच, या घटनेचे राजकारण करणाऱ्यांबाबत संताप आणि नाराजी व्यक्त केली. त्याच वेळी सकल हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पायरी शुद्धीकरणासह महाआरती करीत ‘धूप दर्शवण्याची परंपरा नाहीच,’ असा दावा केला.

ही परंपरा नाहीच त्र्यंबकेश्वरमध्ये संदल काढण्याची प्रथा आहे की नाही, याबाबत अभ्यासक राजेश दीक्षित यांनी मत व्यक्त केले. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महाद्वाराच्या रस्त्यावरून संदल जाते. मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर धूप दाखवण्याची परंपरा आहे. मात्र या संदलमधील कोणीही मंदिराच्या पायरीजवळ किंवा मंदिराच्या आतमध्ये जाण्याची प्रथा नसल्याचे स्पष्टीकरण अभ्यासक राजेश दीक्षित यांनी दिली आहे.तसेच दोन-तीन स्थानिक नागरिकांच्या कृतज्ञतेचा आणि भक्तीचा फायदा घेऊन कुणीतरी बाहेरील लोक या ठिकाणी चुकीची पायंडा-परंपरा पाडत असल्याचा आरोप देखील राजेश दीक्षित यांनी केला. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आतमध्ये इतर धर्मियांना प्रवेश नसल्याचे स्पष्ट मत राजेश दीक्षित यांनी मांडले.

शुद्धीकरण करण्यासह महाआरती केली.

‘हिंदूशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे,’ अशा आशयाचा फलकही उत्तर प्रवेशद्वारावर लावण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी राजकीय वक्तव्ये करून संदलनिमित्त धूप दर्शवण्याची परंपरा नसल्याचा दावा केला, तर त्याच वेळी नगर परिषदेत सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत संदल मिरवणुकीत परंपरेनुसारच धूप दाखविण्यात आल्याचे एकमताने सांगण्यात आले. एकाच वेळी या दोन घटनांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले. राजकीय दबावतंत्र वापरून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ग्रामस्थांसह भाविकांनी केली.

सकल हिंदू महासभेने बुधवारी दुपारी त्र्यंबकेश्वराची महाआरती केली.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, आचार्य तुषार भोसले यांनी राजकीय टीका केली. त्या वेळी मंदिर आवारातून ‘इथे राजकारण करू नका,’ अशी आरोळी एकाने ठोकली. तिथे तैनात दंगल नियंत्रण पथक, ग्रामीण पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा दल या यंत्रणांसह विक्रेते व स्थानिकांनीही या टीकेवरून नाराजी व्यक्त केली.नेमका प्रकार काय घडला?गुलाब शाहवली बाबा संदल मिरवणुकीदरम्यान शनिवारी मुस्लिम समुदायातील पाच-सहा युवक त्र्यंबकेश्वराला धूप दाखविण्यासाठी उत्तर प्रवेशद्वाराजवळ दाखल झाले. देवाला धूप दाखविण्यासाठी मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. ही प्रथा जुनी असून, आम्हाला दर वर्षी आत सोडले जाते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश नसल्याचे सांगून सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला. या वेळी उपस्थित काही भाविकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. त्यानंतर अफवा पसरू लागल्या.वादानंतर गेल्या रविवारी हे प्रकरण मिटले होते. मात्र, राजकीय प्रतिनिधी तसेच काही संघटनांनी यात उडी घेतल्याने वाद वाढला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात घडल्या प्रकाराबाबत मंगळवारी ‘एसआयटी’ स्थापन करण्याचे आदेश दिले. दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांचाही बंदोबस्त वाढला. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून चार संशयितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy