बातमी 24तास, Web News
पुणे, 3 ऑगस्ट : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी शाखा-२ ने लोहगाव आणि हडपसर भागात यशस्वी छापे टाकून दोन कोटी रुपयांची अफू जप्त केली आहे. याप्रकरणी राजस्थानमधील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने लोहगाव परिसरातील पोरवाल रोड येथून राहुल कुमार भुरालालजी साहू (वय ३२, रा. मंगळवाडा, तहसील डुंगला, राजस्थान) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पाच किलो ५१९ ग्रॅम अफू जप्त केली.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी फुरसुंगी परिसरात सापळा रचून मोहनलाल मेगाराम बिश्नोई (वय २४, रा. बागरापूर मारवाडी, जि. बडनेर, राजस्थान) याला अटक केली. पोलिसांनी येरवडा येथे केलेल्या कारवाईत ६० लाख किंमतीचे तीन किलो २९ ग्रॅम अफू जप्त केले.
दरम्यान येरवडा भागातील दुसऱ्या कारवाईत सोनू साहेबराव कोळसे (वय ४४, रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) याला देखील अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभावी कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.