जीवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥’अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे आपण म्हणतो परंतु हेच अन्न जर मोठ्या प्रमाणावर वाया जात असेल तर आपण त्या अन्नाचा अपमान करतोय असेच म्हणावे लागेल. सध्या आखाड महिना चालू असल्याने रोज देव देवतांना नैवेद्य दाखवले जात आहेत, परंतु अन्नाचाच भाग असलेला नैवेद्य मोठ्या प्रमाणावर वाया जात असून अक्षरशः कचरा पेट्यांमध्ये टाकून द्यावा लागत आहे. आज समाजातील काही घटकांना एकावेळी खायची भ्रांत आहे, अशावेळी असे अन्न वाया जात असेल तर ही मोठी खेदाची बाब आहे.हा प्रकार थांबावा यासाठी अशा प्रकारे नैवेद्य ठेवून अन्न वाया घालवण्यापेक्षा शिधा स्वरूपात धान्य संबंधित देवस्थान ट्रस्ट कडे जमा केल्यास त्याचा सदुपयोग होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी देवतांपुढे नैवेद्य न ठेवता त्या त्या ट्रस्ट कडे शिधा द्यावा असे आवाहन बातमी २४ तास करत आहे. प्रत्येक भागातील देवस्थान ट्रस्टने ही त्याबाबतीत नियोजन करावे.सध्या आखाड महिना चालू असल्याने नागरिकांकडून देवदेवतांना नैवेद्य दाखवला जात आहे. हा नैवेद्य दाखवला जात असताना त्यावरून पाणी ओवाळून टाकले जात असल्याने नैवेद्य पूर्ण ओलसर होत आहे, त्यामुळे तो मुक्या प्राण्यांनाही खाता येत नाही. या प्रकारामुळे दाखवण्यात आलेला नैवेद्य पूर्णपणे टाकून द्यावा लागत आहे आणि यात मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होत आहे.