बा विठ्ठला… तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा तर अहमदनगर मधील काळे दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान
बा विठ्ठला… तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा तर अहमदनगर मधील काळे दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान
(पंढरपूर, प्रतिनिधी ) : आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत.
आज त्यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची पूजा करण्याचा सर्वात आधी मान मिळाल्याने आम्ही धन्य झालो, असं भाऊसाहेब काळे म्हणाले. तर बा विठ्ठला… तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं. आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली.त्यांच्या सोबत नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे हे 25 वर्षापासून वारी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दांपत्य पंढरीची वारी करतात. काल आठ तास दर्शन रांगेत काळे दांपत्य उभे होते.श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा झाल्यानंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत भरत गोगावले, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील तसेच मानाचे वारकर श्री व सौ. भाउसाहेब काळे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. पांडुरंगाची भक्तीभावे पूजा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विठ्ठलाकडे राज्याच्या भल्याचं साकडं घातल्याचं ते म्हणाले. सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी पूजा करण्याची मला संधी मिळाली मी माझे भाग्य समजतो. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याचं सगळं काम सुरळीत सुरू असून,पंढरपूरचा विकास आराखडा सगळ्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल असंही त्यांनी सांगितलं.राज्यात काम करण्यासाठी आणखी बळमिळो हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे. मुख्यमंत्री पद मिळालं यामागे खरंच विठ्ठलाचा आशीर्वाद आहे. असेही ते आवर्जून म्हणाले.