बातमी24तास (क्राईम रिपोर्टर ) लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात लष्करी अधिकारी असल्याचे भासवत फसवणूक करणाऱ्या सिक्युरिटी गार्डचे बिंग पुणे पोलिस आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाने फोडले.
या तोतया लष्करी अधिकाऱ्याने खडकी येथील एका निवृत सुभेदार मेजर कडून ४ लष्करी युनिफॉर्म विकत घेतले व त्याचे पैसे न देता फसवणूक केली. तसेच दक्षिण मुख्यालयाच्या आवारात राहत असल्याचे भासवून लष्करी वर्दीवर फोटो काढून दक्षिण मुख्यालयाच्या पत्त्यावर बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार करून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत भाऊराव पाटील (वय ३२, सध्या रा. म्हेत्रे निवास दुर्गानगर, सोनवणेवस्ती चिखली पुणे व मुळ रा.मु.पो. कुपटगिरी ता. खानापुर जि.बेळगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार अमोल परशुराम पिलाणे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हा तब्बल २०१९ पासून बनावट लष्करी अधिकारी म्हणून दक्षिण मुख्यालय परिसरात राहत होता. आरोपी कडून ६३ हजार रुपयांचा मोबाइल, एक आय फोन, एक वन प्लस ९ प्रो के चा मोबाईल फोन, भारतीय सैन्य दलाचे दोन युनिफॉर्म, इतर साहित्य, तीन आधारकार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र व युनिफॉर्म असलेले चार कलर फोटो जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपीवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.आरोपी प्रशांत पाटील हा सिक्युरिटी गार्ड आहे. तो सध्या पुण्यातील चिखली परिसरातील म्हेत्रे निवास दुर्गानगर सोनवणेवस्ती येथे राहायला आहे. तो मूळचा कुपटगिरी (ता. खानापुर जि. बेळगाव, रा.कर्नाटक राज्य) येथील रहिवाशी आहे. त्याने २०१२ पासून आज पर्यन्त तो भारतीय सैन्य दलामध्ये अधिकारी असल्याचे भासवून पुण्यातील खडकी येथील दुकानदार आणि निवृत्त सुभेदार मेजर सुरेश मोरे यांच्याकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन युनिफॉर्म व इतर साहित्य ४,७०० रुपयांत खरेदी केले. मात्र, याचे पैसे नंतर देतो असे सांगून मोरे यांची फसवणूक केली. या सोबतच त्याने सदन कमांड येथे कार्यरत असल्याचे खोटे सांगत सैन्य दलाचा युनिफॉर्म परिधान करून लष्कराचे बनावट ओळख पत्र वापरुन सदन कमांड हेडक्वॉटर क्वीन्स गार्डन येथे राहत असल्याचे भासवून सदन कमांड कार्यालयाच्या पत्त्याचा वापर करुत त्याने बनावट आधारकार्ड काढून घेतले. एवढेच नाही तर या पत्त्याच्या जोरावर त्याने पॅनकार्ड देखील काढले. त्याने लष्करच्या खोट्या ओळखपत्राच्या साह्याने अनेकांची फसवणूक केल्याचे देखील पुढे आले आहे.त्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाने संयुक्त कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सध्या त्याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे करत आहेत.