बातमी24तास
राजगुरुनगर वृत्त सेवा : दि. 28 ऑक्टोबर खेड आळंदी विधानसभा निवडणुकीत प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अमोल दौंडकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां समवेत वाजत गाजत दाखल केला.
आज सकाळी बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच पंचायत समिती आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मार्केट यार्ड ते प्रांत ऑफिस अशी पदयात्रा काढून आपला उमेदवारी अर्ज खेडचे तालुका अध्यक्ष विजय डोळस, माजी सभापती सतीश राक्षे, महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी वंदना सातपुते, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे पाटील यांच्या उपस्थितीत दाखल केला.
या उमेदवारीने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसने महाविकास आघाडीचे मित्रपक्ष विश्वासात घेत नसल्याबाबत खंत व्यक्त केली होती आणि काँग्रेस आपला उमेदवार देणार असल्याची भूमिका जाहीर केली होती.
याप्रसंगी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जमीर काझी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अतिश मांजरे पाटील, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष होले,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश सहाणे, सुभाष गाढवे, सुनील मिंडे, चाकण शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, धनेश म्हसे, निखिल थिगळे, उमेश रानवडे,मयूर आगरकर, गीताबाई मांडेकर, ऍड. जया मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान महाविकास आघाडीचा जागा वाटपात खेडची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या महत्वकांक्षेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मित्र पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलून दाखविले जात आहे.