बातमी 24तास चाकण (वृत्त सेवा)
मुंबईत बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबार चे प्रकरण ताजे असतानाच चाकण औद्योगिक वसाहतीत महाळुंगे गावात दसरा सणाच्या रात्री सौरभ मुळे नामक तरुण व त्याच्या सोबत असलेल्या दोन जणांनी गावातील भैरवनाथ मंदिराच्या बाजूला दांडिया खेळत असलेल्या ठिकाणावरून बाजूला घेऊन एकाजणावर पिस्टल मधून फायरिंग केल्याची आणि त्याच्या सहकाऱ्याला विटाने मारल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, काल १२ ऑक्टोबर रोजी दसरा सणाच्या निमित्ताने रात्री 10 वाजताच्या सुमारास महाळुंगे गावातील भैरवनाथ मंदिरा जवळ, छावा प्रतिष्ठान मित्र मंडळ येथे रास दांडिया कार्यक्रम सुरू असताना आरोपी सौरभ मुळे व शंकर नवगणे यांच्यात भांडण झाले होते. काही वेळाने शंकर याची पत्नी व सौरभची आई यांचे मंडळाचा दांडिया सुरू होता त्याठिकाणी जोरदार भांडण झाले. यांच्या भांडणामुळे दांडियाचा कार्यक्रम बंद केल्यामुळे तेथील स्थानिक महिलांनी सौरभ याच्या सोबत भांडण करून आमच्या भागात राहत असून आमच्यावर दादागिरी करतो का? असे बोलून त्याला हातानी, बुक्यानी व चपलानी मारहाण केली. सौरभला मारहाण झाल्यामुळे त्याच्या बरोबर असलेल्या दोन सहकाऱ्यांपैकी एकाने निलेश आसाटी याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या जवळ असलेल्या पिस्टलने निलेशवर फायरिंग केली. यामध्ये एक गोळी निलेशच्या छातीवर लागल्याने निलेश गंभीर जखमी झाला,तसेच सौरभ बरोबर असलेल्या दुसऱ्या सहका-याने यातील फिर्यादी सूरज गणपत कदम याच्या डोक्यात वीट मारून गंभीर दुखापत केली. आरोपी यावरच थांबले नाही तर त्यांनी घटना घडल्यानंतर हवेत गोळीबार करून परिसरात मोठी दहशद माजवली . यामुळे काही काळ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणात आरोपी सौरभ मुळे(वय-२७ वर्षे)रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे व त्याचे दोन सहकारी ( नाव पत्ता माहित नाही ) यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ३(५), आर्म अँक्ट ३/२५ क्रिमिनल लॉ अँमेन्टमेन्ट अँक्ट ३, ७ व महा. पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाळुंगे MIDC पोलीसाकडून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते हे करत आहेत.
दरम्यान,चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बैठक घेऊन या मध्ये गुन्हेगारांना सज्जड दम भरला होता. मात्र गुन्हेगारी मध्ये निर्ढावलेले गुन्हेगार आपली दहशत माजविण्यासाठी कुठेही कमी पडताना दिसत नाही. चाकण औद्योगिक वसाहतीतीलमुळे चाकण परिसरातील गावे गुन्हेगारीचे हॉटस्पॉट तयार होऊ पाहत आहे. मागील काही दिवसापूर्वी काही स्थानिक संघटित गुन्हेगारांवर महाळुंगे MIDC पोलिसांकडून तडीपारी व मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तरी महाळुंगे गावातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. आता यावर पोलिसांनी कडक पाऊले उचलून ठोस अशी कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.