शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव प्रबळ दावेदार
बातमी 24तास(वृत्त सेवा ) : आगामी खेड-आळंदी विधानसभेत महाविकास आघाडी,महायुती निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे आघाडी व युती खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खेड आळंदी मतदारसंघात महायुतीतील अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील,तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा कडून जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, अमोल पवार,राष्ट्रवादी शरद पवार गटा कडून नवीन चेहरा म्हणून सुधीर मुंगसे व लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान भाजपा मधून प्रवेश केलेले अतुल देशमुख, भाजपाकडून भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील तर शिंदे गट शिवसेंनेकडून अक्षय जाधव , नितीन गोरे,भगवान पोखरकर हे प्रबळ दावेदार आहेत.त्याप्रमाणे सर्वानी तयारीही सुरू केली आहे. पण सध्याचे मतदारसंघातील राजकीय वातावरण बघता दिलीप मोहिते पाटील यांना पर्याय म्हणून पक्षातीलंच पर्यायी उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदादा पवार यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून विविध विकास कामांची भूमीपूजने केली. त्यावेळी भाषणात बोलताना महायुतीत जागा आपल्या पक्षाला सुटली तर दिलीप मोहिते पाटील यांना साथ देण्याची हाक अजितदादा पवार यांनी दिली.आणि नुकत्याच झालेल्या पक्षातंर्गत बैठकीत मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे सुतोवाच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले. त्यामुळे खेडमध्ये पुन्हा मोहिते पाटील यांनाच उमेदवार मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. त्या उलट सध्या तालुक्यात नवा चेहरा म्हणून अक्षय जाधव,सुधीर मुंगसे, बाबाजी काळे,नितीन गोरे, या इच्छुकांनी वातावरण निर्माण केले आहे. त्यात त्यांनी कुणावर टिका न करता तरुणाईला जोडण्याचे आणि तालुक्यातील जीवंत प्रश्न तरुणाई पुढे मांडण्यास सुरुवात केली आहे. विकासाचे मुद्दे आणि कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे वरील इच्छुक उमेदवार यांची विधानसभेची तयारी जोरात असल्याचे चित्र दिसत आहे.
अक्षय जाधव,सुधीर मुंगसे, नितीन गोरे, बाबाजी काळे, हे या वेळच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहरे आपल्या सर्व ताकतीनिशी उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. सर्वगुण संपन्न असतानाही फक्त तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाच्या आणि तरुणाईच्या उत्कर्षासाठी त्यांनी कोणत्याही भावात विधानसभा निवडणूक लढविण्याचा चंग बाधला आहे.
जाधव,मुंगसे,काळे, गोरे,यांना तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तालुक्यातील तरुणाईच्या हाताला काम नाही. आमच्या जमिनी जाऊन आमचे मुले त्याच कंपनीत डबे घेऊन कामाला जात असतील तर हे चित्र कुठे तरी बदलविण्यासाठी आम्हाला आता तरुणाईला साथ देऊन युवा चेहरा आमदार करायचा आहे. त्यामुळे कोणावर टीकाटिप्पणी न करता फक्त तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. महायुतीचे खेड-आळंदी विधानसभेत विद्यमान आमदार असल्याने वरिष्ठ पातळीवरूनही या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभेत मोठी चुरस बघायला मिळणार आहे. जर वरिष्ठ पातळीवरून आतून मैत्रीपूर्ण लढतीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला तर खेड-आळंदी विधानसभेचे चित्र बदलल्या शिवाय राहणार नाही. मतदारसंघात महायुती बरोबरच महाविकास आघाडीतही इच्छुकांची संख्या कमी नाही. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
खेड तालुक्याला आज पर्यंत मंत्री पदाचे फक्त गाजर दाखविण्यात आले निवडणुका आल्या की पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून तालुक्यातील भावनिक साद घातली जाते. तालुक्यातील जनतेला तुम्ही निवडून दिलेला आमदार मंत्री होणार लाल दिवा मिळणार या आशेवर मंत्री पदाची गाजर दाखवले जाते. खेड तालुक्याच्या शेजारी असणारा आंबेगाव तालुका नामदार दिलीप वळसे पाटील यांना महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच मंत्रीपदाची लॉटरी लागलेली आहे असे असताना वरिष्ठ नेत्यांकडून खेड तालुका नेहमीच दुर्लक्षित झाला. तत्कालीन आमदार स्वर्गीय साहेबराव बुटे पाटील, स्वर्गीय नारायणराव पवार, स्वर्गीय सुरेश गोरे,विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होती मात्र ती प्रत्येक निवडणुकीत पुढे ढकली जाते. त्यातही स्वर्गीय आमदार नारायण पवार तसेच विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही तीन टर्म राजकारणात काढले आहेत अध्यापही मंत्रीपदाचे गाजर तालुक्याला देण्यात सत्ताधीश काय भूमिका निभवतात याकडे तालुक्याचे लक्ष आहे. खेड तालुक्याला मंत्री पद मिळण्यात शेजारील आंबेगाव तालुक्याचा नेहमीच अडसर ठरला आहे जाणकारांच्या बोलण्यातून दिसत आहे. दरम्यान, खेड तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार खरच अशी सुरेश गोरे यांच्या पत्नी यादेखील राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे या विधानसभेमध्ये त्यांना अधिकृत पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर तालुक्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळू शकतो असे काही राजकीय विश्लेषकांनी आपले मत मांडले आहे. तत्कालीन माजी आमदार स्व.सुरेश गोरे यांनी खेड तालुक्यात केलेल्या विकास कामाच्या जोरावर तसेच सहानुभूतीवर खेड तालुक्यातील पहिल्या महिला आमदार म्हणून राजकीय पटलावर त्या आपली ओळख निर्माण करू शकतात.