बातमी 24तास चाकण :- 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यकारी विश्वस्त मोतीलाल सांकला यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
चाकण शिक्षण मंडळाचे, कला व वाणिज्य महाविद्यालय व ललिता मोतीलालजी सांकला फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप करण्यात आले. महाविद्यालयाने ह्यावर्षीपासून वाहतूक व पर्यटन, पत्रकारिता अशा व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहे. ह्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च महाविद्यालय करणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त सचिव डॉ. अविनाश अरगडे यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च LMS फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत केला जाईल असे कार्यकारी विश्वस्त मोतीलाल सांकला यांनी सांगितले. महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू व होतकरू 30 विद्यार्थ्यांना मोफत क्रमिक पुस्तके वाटण्यात आली. पुस्तके वाचल्यानंतर पुस्तक परीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून प्रथम क्रमांकास 3000 रुपये, द्वितीय क्रमांकास 2500 रुपये व तृतीय क्रमांकास 2000 रुपये पारितोषिक दिले जाणार असल्याचे अतुल वाव्हळ यांनी जाहीर केले. त्यावेळी उद्योजक ध्रुव कानपिळे, तुषार मुटके, कीर्तिभाई शहा, रामचंद्र कड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश लाटणे, विश्वस्त संतोष सांकला, डॉ. असीत अरगडे, अभिमन्यू शेलार, सौ. वैशाली ओसवाल, डॉ. उमेश भोकसे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी डॉ. हेमकांत गावडे यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. मिलिंद भुजबळ यांनी आभार मानले.