बातमी 24तास चाकण प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष किरण वसंतराव मांजरे ( वय ६५ वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. किरणशेठ नावाने संपूर्ण तालुकाभर परिचित असलेल्या किरण मांजरे यांच्या निधनाने खेड तालुक्यातील राजकीय वर्तुळात पोकळी निर्माण झाली आहे. खेडचे माजी आमदार कै. वसंतराव मांजरे यांचे पुत्र असलेले किरण मांजरे विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधित्व करत होते. चाकण दुग्ध संस्था, महावीर पतसंस्था, चाकण व्यापारी महासंघ, शिक्षण संस्थेचे ते प्रमुख म्हणून मागील अनेक वर्ष कार्यरत होते. राजगुरुनगर सहकारी बँक या तालुक्यातील अग्रगण्य बँकेचे ते मागील अनेक वर्ष सलग संचालक व अध्यक्ष देखील होते. खेडचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर रिक्त झालेल्या चाकण मधील जिल्हा परिषद गटातून किरण मांजरे निवडून गेले होते. विविध संस्था, संघटना आणि पदांवर काम करताना त्यांची उल्लेखनीय कारकीर्द होती. प्रचंड लोकसंग्रह, दांडगा जनसंपर्क असलेले किरण मांजरे चाकण मध्ये विविध ट्रान्सपोर्ट, क्रेन आदी विविध व्यवसायात देखील सक्रीय होते. अतिशय दीर्घ आणि दैदिप्यमान राजकीय कारकीर्द असलेले किरण मांजरे यांच्या निधनाने मांजरे परिवारावर आणि खेड तालुक्यातील जनतेवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा , मुली , दोन भाऊ, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक बाळासाहेब मांजरे यांचे ते जेष्ठ बंधू तर उद्योजक सचिन मांजरे यांचे ते वडील होत.