बातमी 24तास(पुणे,वृत्त सेवा ) : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ किलोमीटर आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड)प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्व मार्गातील हवेली आणि खेड तालुक्यातील जमिनींच्या संपादनाबाबत निवाडा जाहीर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी राज्याचे वित्तमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी साडेदहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यांपैकी हवेली आणि खेडमधील १५ गावांसाठी ५४१ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने निश्चित केले. या प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग आला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ किलोमीटर आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व मार्गातील मावळ तालुक्यातून ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांतून प्रस्तावित आहे, तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील एक, हवेली ११, मुळशी १५ आणि मावळ तालुक्यातून सहा गावे बाधित होणार आहेत. पश्चिम मार्गावरील ३४ पैकी ३१ गावांमधील ६४४ हेक्टर जमिनीच्या संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २९७५ कोटी रुपये मोबदला दिला आहे. भोर तालुक्यातील पाच गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झाल्याने या गावातील मूल्यांकनाचे दर निश्चितीचे काम आचारसंहितेपूर्वी सुरू करण्यात आले होते.
पश्चिम मार्गाच्या भूसंपादनासाठी यापूर्वीच गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाकडून (हुडको) दहा हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. या माध्यमातून पश्चिम मार्गाचे बहुतांश भूसंपादन मार्गी लागले आहे. पूर्व मार्गाच्या भूसंपादनासाठी रस्ते महामंडळाला निधीची गरज होती. त्यानुसार महामंडळाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी तब्बल दहा हजार ५१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.या गावातील निवाडे जाहीर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या पूर्व मार्गातील खेड आणि हवेली तालुक्यातील जमिनींच्या संपादनाबाबत निवाडा जाहीर करण्यात आला आहे. हवेली तालुक्यातील मौजे बिवरी, गावडेवाडी आणि वाडेबोल्हाई, तर खेड तालुक्यातील सोळू, निघोजे, मोई, मरकळ, कुरुळी, खालुंब्रे, केळगाव, गोळेगाव, धानोरे, चिंबळी, चऱ्होली आणि आळंदी या गावांचा समावेश आहे. हवेली तालुक्यातील गावांसाठी ६४ कोटी २९ लाख रुपये, तर खेड तालुक्यातील गावांसाठी सुमारे ४७६ कोटी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.