(मुंबई वृत्त सेवा ) निकृष्ट प्रशासन मानकांमुळे उद्भवलेल्या काही भौतिक समस्यांमुळे’ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अभ्युदय सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली असून दैनंदिन प्रशासनामध्ये त्रुटी असल्याचे कारण देत रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी मुंबईस्थित अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. रिझर्व्ह बँकेने भारतीय स्टेट बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. सत्य प्रकाश पाठक पुढील एक वर्षासाठी अभ्युदय सहकारी बँकेचा सर्व कारभार पाहतील. तर बँकेचे संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी बरखास्त राहणार आहे.
यासंदर्भात जाणकार व्यक्तीने सांगितले की, बँकेला या काळात शाखाविस्तार करता येणार नाही. मात्र दैनंदिन सर्व प्रकारचे व्यवहार करता येणार आहेत. बँकेच्या सर्व शाखा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य खातेदाराने घाबरून जाण्याचे कारण नाही. बँकेची आर्थिक सुस्थिती असून सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले आहे. रिझर्व्ह बँकेला प्रशासकीय कामकाजात अनियमितता आढळून आल्यामुळे ही कारवाई झाली आहे. प्रशासकीय शिस्तीचा अभाव रिझर्व्ह बँकेला जाणवल्यामुळे संचालक मंडळ बरखास्त केले गेले आहे. बँकेचे कामकाज पूर्वीप्रमाणेच परंतु प्रशासकाच्या अंतर्गत सुरू राहणार आहे.
रिझर्व्ह बँकेने अभ्युदय बँकेवर नेमलेल्या प्रशासक सत्यप्रकाश पाठक यांच्याकडे बँकेच्या कारभारात सुसूत्रता आणून बरखास्तीच्या १२ महिन्यांत बँकेचे कार्यचालन सुविहित ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी असणार आहे. रिझर्व्ह बँकेने सल्लागार समितीही नेमली आहे. ही समिती प्रशासकाला त्याची कर्तव्ये बजावताना साह्य करेल.
भारतीय स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक वेंकटेश हेगडे, सीए महेंद्र छाजेड आणि कॉसमॉस सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले हे या सल्लागार समितीचे सदस्य आहेत.सामान्य बँकिंग कामे सुरळीतदरम्यान, अभ्युदय सहकारी बँक लिमिटेड विरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे. कारण बँकेत आढळलेल्या ‘निकृष्ट प्रशासन मानकांमुळे उद्भवलेल्या काही भौतिक समस्यांमुळे’ हे पाऊल आवश्यक होते. आरबीआयकडून व्यवसायावर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत आणि प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली बँक आपले सामान्य बँकिंग उपक्रम सुरू राहील.