वंचित घटकातील नागरिकांच्या मतदार नोंदणीकरिता समन्वय अधिकाऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल पुणे, दि. १ : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात महिला, दिव्यांग, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीमधील व्यक्ती, तृतीयपंथीय व्यक्ती, औद्यागिक क्षेत्रातील कामगार, युवा मतदार यांच्या मतदार नोंदणीकरिता समन्वय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. वंचित घटकातील मतदार नोंदणी वाढवण्याच्यादृष्टीने समन्वय अधिकाऱ्यांची तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, हडपसर विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी विवेक जाधव, पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक शालिनी कडू, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, काही वंचित घटकातील मतदारांची नोंदणी कमी प्रमाणात होत असल्याने त्यांच्या मतदार नोंदणीसाठी प्रशासनातर्फे समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. महिलांची नोंदणी खूप कमी असलेलेही काही मतदार संघ आहेत. गावनिहाय यादी तयार करून मंडळ आणि तालुक्याच्या ठिकाणी शिबिरे घ्यावीत. बचत गट, स्वयंसहाय्यता गट व विविध संस्था यांच्याशी समन्वय साधून महिलांची नोदणी वाढवावी. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींचा शोध घेऊन शिबिरात त्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तृतीयपंथीय मतदारांच्या नोंदणीसाठी तृतीयपंथीयांची अधिक वस्ती असणारी ठिकाणे ठरवावीत. त्याच ठिकाणी त्यांचा अर्ज नमुना ६ भरून घेण्यात यावेत. कमीत कमी ५ हजार तृतीयपंथीय व्यक्तींच्या नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्यादृष्टिने प्रयत्न करावेत. दिव्यांग अनुदानाच्या यादीतून तसेच दिव्यांगाच्या निधीतून लाभ मिळणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची गाव निहाय यादी तयार करावी. त्यानुसार मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्यात यावेत. जिल्ह्यात किमान ३ लाख दिव्यांग व्यक्तींचे मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. देह व्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांच्या नाव नोंदणीकरिता त्यांच्यासाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील संस्थाशी समन्वय साधून प्रयत्न करावेत. पुणे जिल्ह्यात खासगी औद्यागिक क्षेत्रात २५ लाखापेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. ज्या कंपनीत जादा कामगार आहेत अशा ठिकाणी शिबिरे घेवून नव मतदान नोंदणी करण्याचे प्रयत्न करावेत. युवा मतदारांसाठी ग्रामीण व शहरी क्षेत्रातील महाविद्यालयाअंतर्गत राष्ट्रीय सेवा संघटक यांच्याशी समन्वय साधून नवमतदार नोंदणीबाबत कार्यवाही करावी. युवा मतदारांसाठी दररोज शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. हे करत असताना प्रचार प्रसिद्धीवरही भर द्यावा. मतदान जागृतीसाठी घंटागाडीवर प्रसिद्धी द्यावी. गावात दंवडीचे आयोजन करावे. प्रत्येक आठवड्याला राजकीय प्रतिनिधींची बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले.

येत्या शनिवार रविवारी विशेष शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील सर्व मतदान नोंदणी अधिकारी यांनी ४ व ५ नोव्हेंबर (शनिवार व रविवार) तसेच २५ व २६ नोव्हेंबर (शनिवार व रविवार) या सुट्टीच्या दिवशी आपल्या मतदार संघात विशेष मोहिमांचे आयोजन करावे. या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार असून मतदार नोंदणी, वगळणी आदी काम सुव्यवस्थित पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.बैठकीस महिला व बालकल्याण अधिकारी मोनिका रंधवे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुधीर सरवदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, औद्यागिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय व्यवस्थापक शिवाजी राठोड, श्रीकांत जाधव, सहायक मतदार अधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy