(वृत्त सेवा) गेले दोन महिन्यांपासून दडी मारून बसलेला वरुण राजाने काल पासून पुन्हा हजेरी लावली आहे.कित्येक दिवस प्रतिक्षा असलेल्या मॉन्सूनची पुन्हा सुरुवात झाली असून भीमा, कृष्णा खोर्यात पावसाने गुरुवारी सायंकाळपासून जोरदार सलामी दिली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे़.
पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती. त्यातून धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला होता. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील धरणे पूर्ण भरलेली नसल्याने उजनी धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरला नाही .सर्वांना पावसाची प्रतिक्षा असताना गुरुवारी सायंकाळपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. पवना धरणाच्या परिसरात गेल्या २४ तासात ७३ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण १०० टक्के भरले आहे़.
पुणे जिल्ह्यातील अनेक धरण क्षेत्रात जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. निमगिरी येथे १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई आणि पुण्यात पहाटेपासून तर विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे.
दरम्यान, कालपासून अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पुढील ४८ तासांत कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच राज्यात ९ आणि १० तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून अधून मधून पावसाच्या तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ आणि १० तारखेला पावसाचा जोर कमी होणार आहे. तसेच, मुंबईसह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ठाणे परिसरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.