(चाकण, संजय बोथरा) पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चाकण पोलीस ठाण्यात चाकण व या परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापक व विभागप्रमुखांची विद्यार्थ्यांमध्ये वाढणारे गैरवर्तन, गुन्हेगारी व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत कार्यशाळा उत्साहात पार पडली.
शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये वाढणारी गैरकृत्य, विविध समस्या व त्यातून उदभवणारे वेगवेगळे विषय, सायबर क्राईम, मुलींची छेडछाड, शाळांच्या जवळपास व रस्त्यावर ग्रुपने उभे राहून ट्रॅफिकला अडचणीत आणून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास देणे, गाड्या घेऊन शाळेच्या नंतर इतरत्र फिरणे, गुंडगिरी करणे, व्यसन करणे याविषयी चर्चा करून त्याच्यावर काय काय उपाय आपल्याला करता येऊ शकतात. विद्यार्थ्यांमध्ये बदल कसा घडवता येईल, यासंदर्भात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
चाकण व परिसरातील सर्व शाळांतील मुख्याध्यापक व विभाग प्रमुख यांची एकत्रित कार्यशाळा आयोजित करून यावेळी त्यांना आपापली मतं मांडण्यास सांगण्यात आले. यावेळी माजी सैनिक सेवा दलातील निवृत्त अधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, महाळुंगे इंगळेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, चाकण वाहतूक विभाग प्रमुख ज्योती पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे, पोलीस हवालदार रोहिदास मोरमारे, एम. ए. बिक्कड, प्रतीक चव्हाण आदींसह पोलीस अधिकारी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे स्कुलच्या मुख्याध्यपिका प्रमिला गोरे यांनी यावेळी दामिनी पथक शाळांना भेट देत असल्या बाबत कौतुक केले. चाकण पोलीस स्टेशन यांनी हा अनोखा उपक्रम सर्व शाळांना विश्वासात घेऊन राबविल्याबद्दल व सहकार्य करण्याचे आश्वसन दिल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. प्रशालेतील प्रमुखांनी यावेळी आपल्या समस्या मांडल्या. पोलीस अधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शक सूचना देवून तात्काळ कार्यवाही बाबत संबधित विभागांना आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे यांनी आभार मानले.