
बातमी 24तास,चाकण (प्रतिनिधी ) मुटकेवाडी (ता. खेड) येथील प्राथमिक शिक्षक बापूसाहेब सोनवणे यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. शाळेपासून दूर अंतरावरून पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून त्यांनी स्वतःच्या खर्चातून सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत.
दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळा व पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. पायी प्रवासामुळे त्यांचा वेळही वाया जातो, ज्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. काही विद्यार्थ्यांकडे सायकली असल्या तरी सर्वांना त्या परवडत नाहीत. हीच गरज लक्षात घेऊन सोनवणे यांनी पुढाकार घेतला.शाळेतील इयत्ता सहावीचे विद्यार्थी अथर्व ससाणे आणि सिद्धांत लामदाडे यांना या सायकली सुपूर्द करण्यात आल्या. या सायकली विद्यार्थ्यांकडे शिक्षण पूर्ण होईपर्यंत राहणार असून, त्यांची देखभाल व दुरुस्ती विद्यार्थ्यांनीच करायची आहे.या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे “वापरा आणि हस्तांतरित करा” हे तत्त्व. विद्यार्थी शाळा सोडताना सायकली पुन्हा शाळेत जमा करतील आणि त्या पुढील गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जातील. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवीन प्रेरणा मिळणार असून, भविष्यात आणखी सायकली उपलब्ध करून देण्याचा मानस सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीही त्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवले आहेत.या उपक्रमाचे कौतुक पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, केंद्रप्रमुख सुनंदा पाटील, हिरामण कुसाळकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता आहेर यांनी केले आहे.सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून, हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.