पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथील वढू चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकी भीषण अपघातात स्पोर्ट बाईकवरील तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे.पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅव्हल बस चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक सुनील भुजाडे (२३) असे या अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकी चालक हा भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाला असून त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, नगरहून पुण्याच्या दिशेने जाणारी ट्रॅव्हल क्र. एम. एच. १२एच. बी. २८५९ ही गाडी महामार्गावर असणाऱ्या वढू बु. चौकात आली. त्यावेळी एक दुचाकी चालक भरधाव वेगात आपली स्पोर्ट बाईक घेऊन ट्रॅव्हलसला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्या गाडीच्या चाकाला धडकला. त्यानंतर त्याच्या डोक्याला मार लागून तो रस्त्यावर खाली पडला होता. त्याच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव होत होता. ट्रॅव्हल चालकाने आणि स्थानिक नागरिकांनी त्याला रस्त्यावरून बाजूला ठेवले. मात्र त्याची कोणतीही हालचाल नसल्याने तो मृत झाल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणात ट्रॅव्हल चालक सोहन राठोड यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.