बातमी24तास, (वृत्त सेवा) श्री.एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थी मंत्रिमंडळ पद व शपथग्रहण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांतील नेतृत्व, संघटन, कौशल्य, इ. गुणांना वाव मिळावा यासाठी शालेय स्तरावर निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून शालेय मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली.
विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तृत्वाची जाण होण्यासाठी त्यांना त्यांच्या पदाची शपथ देण्यात आली.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, पोलीस कॉन्स्टेबल सौ.वैशाली खंडागळे, डिंपल आदक, प्रियंका गिरी, तसेच एस्.पी.देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख, सचिव सौ. रोहिणी ताई देशमुख, विद्यानिकेतन स्कूलचे प्राचार्य दीपक शिंदे व विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य सौ .स्वाती रणदिवे व इतर शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करत सरस्वतीस्तवन सादर करण्यात आले. कार्यक्रमाची माहिती व पाहुण्यांचे स्वागत शालेय सहशिक्षिका सौ. स्नेहल डवले यांनी केले. शाळेचा झेंडा फडकावून शालेय ध्वजगीत म्हणून झेंड्याला वंदन करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . तद्नंतर ढोल पथकाच्या तालावर विद्यार्थी संचलन (मार्च पास )झाले तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पदानुसार बॅच लावून सन्मानित केले.तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. दीपक शिंदे यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर शपथ विधी कार्यक्रम पार पाडण्यात आला.शालेय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले . निवडणूक प्रक्रियेत जास्त मतांनी निवडून आलेली विद्यार्थीनी कु. निकीता तायडे हिने विद्यार्थीनी प्रतिनिधी या नात्याने असलेली तिची जबाबदारी व कार्य तीला असलेली त्याविषयीची जाणीव आपल्या भाषणातून व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकावर जास्त मते मिळवणारा विद्यार्थी कु. शौर्य सुर्वे या विद्यार्थ्यांने शालेय विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रशालेतील सर्व कामकाज शिस्तबद्ध व इतर सर्व समितीच्या सहकार्याने होईल त्याचबरोबर सर्वानुमते निर्णय घेतले जाईल असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रमुख पाहुणे नामदेव तलवाडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मेहनतीचे तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले . मुलांनी मोबाईलवर जास्त वेळ खर्च न करता अभ्यासात जास्तीत जास्त वेळ द्यावा व ज्या गोष्टीसाठी आपल्याला मोबाईल हवा असेल त्याच गोष्टीसाठी मोबाईलचा वापर करावा. मोबाईल चे दुष्परिणाम व चांगल्या सवयी व वाईट सवयी त्याचे होणारे परिणाम त्यांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. तर शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती रणदिवे यांनी विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी व इतर शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थी प्रतिनिधी यांना शुभेच्छा देत व अभ्यासाविषयी काही चांगल्या गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच शाळेचे प्राचार्य दीपक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी प्रतिनिधींना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत त्यांच्या पद नियुक्ती निमित्ताने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती मॅडम व सौ प्राजक्ता मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमात शेवटी शालेय सहशिक्षिका सौ.नम्रता झोपे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रम संपन्न झाला.