बातमी 24तास Web News Portal
(प्रतिनिधी आरिफ भाई शेख)
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी व पिंपरीचिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त यांची संयुक्त पाहणी
संत ज्ञानेश्वर माऊली आषाढी पालखी सोहळा 2023 जवळ आला असून राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून आळंदी घाटा नजीकच्या जलपर्णी काढण्याच्या कामकाजाची आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संयुक्त पाहणी करून सदर काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आळंदी हद्दीतील इंद्रायणी पात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामास नगरपरिषदेच्या विनंती वरून पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत मागील 4 दिवसांपासून सुरुवात झाली आहे. सदर कामाची प्रगती पाहून आवश्यक त्या सूचना देण्याकरिता या दोन प्रमुख अधिकाऱ्यांनी हा संयुक्त पाहणी दौरा केला. काल पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आषाढी वारी पूर्व तयारी बैठकीत डी डी भोसले पाटील यांनी इंद्रायणी पात्रातील जलपर्णी काढण्याच्या सुरू असलेल्या कामास आणखी गती देणेबाबत सूचना मांडली होती.या अनुषंगाने प्रशासनाने तत्काळ या प्रश्नाची दखल घेवून या संयुक्त पाहणी द्वारे आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना व यंत्रणांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पाहणी वेळी आळंदी नगरपरिषद चे कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, बांधकाम अभियंता संजय गिरमे, मिथील पाटील,बोत्रे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे आरोग्य विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.