बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल
राजगुरूनगर प्रतिनिधी : भारतातील कोणत्याही निवडणूकीमध्ये ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात येवू नये यासाठी खेड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. अनेक विकसित आणि प्रगत असणाऱ्या लोकशाही देशांनी ईव्हीएम मशिनवर बंदी घातलेली आहे. बांग्लादेश निवडणूक आयोगाने, संसदीय निवडणूकीत वापर केलेला नाही. नेदरलँडने पारदर्शकतेच्या अभावामुळे ईव्हीएम मशिनवर बंदी घातलेली आहे तर जर्मनीने त्यांना राजकीय वापरासाठी अयोग्य घोषित केले आहे. या यंत्रातील माहितीची चोरी करता येते तसेच या माहितीमध्ये फेरफार करता येते त्यामुळे जर्मनीचे सर्वोच्च न्यायालयाने या यंत्रांना असंवैधानिक घोषित केलेले आहे.
आर्यलडने ईव्हीएम मशिनच्या संशोधनावर तीन वर्षात ५१ दशलक्ष पौंड खर्च केले परंतु शेवटी ईव्हीएम मशिन प्रणाली रद्द करण्याचा निर्णय घेतला ईव्हीएम मशिन निवडणूकीच्या निकालाशी सहज तडजोड करू शकते असे नमूद करून इटलीनेही ईव्हीएम मशिनवर बंदी घातलेली आहे. इंग्लंड आणि फ्रान्स ही दोन राष्ट्रे ईव्हीएम मशिनच्या वापरापासून दूर राहीलेली आहेत. अशा परिस्थितीत भारतासारख्या जगातील मोठी लोकशाही असलेल्या देशाने ईव्हीएम मशिनचा वापर करणे असंविधानिक आहे.
भारताचे संविधान अनुच्छेद ३२४ अन्वये निवडणूक स्वतंत्र (free) आणि योग्य (fair) होण्याची हमी दिलेली आहे. त्यामुळे भारतातील कोणत्याही निवडणूकीमध्ये ईव्हीएम मशिनचा वापर करणेसाठी बंदी घालणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे, भारतातील कोणत्याही निवडणूकीमध्ये ईव्हीएम मशिनचा वापर करणेत येवू नये असे खेड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने खेड नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव अमोल दौंडकर, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे, युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अतिश मांजरे पाटील, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष होले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश सहाणे, उमेश रानवडे, युवक काँग्रेसचे सचिव धनेश म्हसे, लीगल सेलच्या जिल्हाध्यक्ष जया मोरे, कमलेश पठारे आदी उपस्थित होते.