बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल (पुणे वृत्त सेवा ) : स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपी पित्याला दिलेला जामीन विशेष पॉक्सो न्यायालयाने रद्द केला.सदर आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याने तक्रारदाराला वारंवार धमक्या देऊन मारहाण करून त्रास दिल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा निर्णय घेतला. आरोपीची चार जानेवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली आहे.या प्रकरणातील आरोपी पोलिस दलात कर्मचारी असून . त्याने २०२२ मध्ये स्वतःच्या मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीने विशेष पॉक्सो न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळविला होता. मूळ जामीन प्रलंबित असतानाही तपासाधिकाऱ्यांनी वेळेपूर्वीच दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे आरोपीला जामीन मंजूर झाला. मात्र आरोपीने तक्रारदाराला त्रास दिल्यामुळे त्यांनी वकील सुशांत तायडे, दिनेश जाधव, जितू जोशी, प्रज्ञा कांबळे, शुभांगी देवकुळे आणि प्रियांका घाडगे यांच्यामार्फत मार्चमध्ये जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला.