बातमी 24तास
Web News Portal(क्राईम रिपोर्ट )
राजकीय वादातून वर्चस्वाला धक्का निर्माण होईल या भीतीने जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या हत्ये प्रकरणी आमदार सुनील आण्णा शेळकेसह त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह आरोपी शाम निगडकर आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
या बाबत किशोर शेळके यांच्या आई सुलोचना गंगाराम आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत तक्रार दिली असून या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय वादातून ही हत्या केल्याचा आरोप किशोर आवारे यांच्या आईने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे जनसेवा विकास सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून तळेगाव दाभाडे येथे सामाजिक काम करत होते. तसेच जनसेवा विकास सेवा आघाडी या पॅनेलमधून तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रिय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनिल शेळके, सुधाकर शेळके संदीप गराडे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच वाद व्हायचे.”गेल्या सहा महिन्यांपासून माझा मुलगा किशोर हा नेहमी मला आमदार सुनिल शेळके त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांच्यापासून त्याच्या जिवाला धोका असल्याचं सांगत होता”, असं सुलोचना आवारे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. तसेच “१५ सप्टेंबर २०२२ रोजी सुलोचना आवारे यांच्या गाडीचा चालक प्रविण ओव्हाळ याला सुधाकर शेळके आणि त्यांच्या साथीदारानी शिवीगाळ केली होती. तसेच किशोर हे त्यांचा मित्र संतोष शेळके याच्यासोबत फिरत असे ही गोष्ट सुनिल शेळके आणि सुधाकर शेळके यांना आवडत नव्हती. कारण सुनिल शेळके यांचे संतोष शेळके सोबत राजकीय वितुष्ट होते. तर किशोर हा संतोष शेळके यास नेहमी मदत करत असे म्हणून सुनिल शेळके आणि सुधाकर शेळके हे किशोर आवारेंवर नेहमी चिडून असे”, असंही फिर्यादीत म्हटलं आहे.
दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोलनाका टोलमुक्त व्हावा यासाठी किशोर आवारे हे सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून लढा देत होते. त्यामुळे अनेकांना आवारे यांचं हे आंदोलन खूपत असल्याच सांगितलं जात होतं. त्यातूनच ही हत्या झाली का? असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
मावळ तालुक्यातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांच्या हत्येच्या निषेधार्थ तळेगांव परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली होती. या हत्याकांडानंतर प्रत्येक चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
किशोर आवारे यांच्या आईने एफआयआर मध्ये मावळचे राष्ट्रवादीच्या आमदारावरच हत्येप्रकरणी थेट आरोप केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या हत्येचा कट मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी इसमांचा उल्लेख आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. श्याम निगडकरने साथीदारांच्या मदतीने आवारे यांची तळेगाव नगरपरिषदेसमोरच भर दुपारी गजबजलेल्या ठिकाणी गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांनी कटकारस्थान रचून त्यांचाच साथीदार श्यामला ही हत्या करायला लावली, असा आरोप किशोर आवारे यांच्या आईने एफआयआरमध्ये केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.