बातमी 24तास Web News Portal
(मुंबई प्रतिनिधी ) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये नवचैतन्य पसरले आहे . या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालेला बघायला मिळला तर काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारत आपल प्रभाव दाखवला आहे.विशेष म्हणजे कर्नाटकात भाजपच्या पराभवामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे . काल कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आनंद साजरा करण्यात आला. तर शिवसेना ठाकरे गटाच्या गोटातही हालचालीना वेग आला . ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली . त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांमधील मतभेद समोर आले. पण आता हे सर्व मतभेद बाजूला करून महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकजुटीने पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्नाटकातील निकालामुळे महाविकास आघाडीला उभारी आल्याचं चित्र आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीची आज सायंकाळी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे इतर महत्त्वाचे नेते असणार आहेत . दरम्यान, कर्नाटकातील निकाल समोर आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. “नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता निवडणूक जिंकण्यासाठी चालणार नाहीत. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या दहशतीला न जुमानता काँग्रेस पक्ष तिथे उभा राहिला. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर ईडीची दहशत दाखवण्यात आली. शिवकुमार यांना तर तुरुंगात टाकण्यात आलं होतं. या सगळ्यांना न जुमानता कर्नाटकच्याजनतेने निर्भयपणे हुकूमशाहीचा पराभव केला आहे. त्यामुळे कर्नाटकची जनता कौतुकास पात्र आहे”, असं संजय राऊत म्हणाले.या निकालावर राज्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारलं असता फडणवीस यांचा राजकीय अभ्यास तोकडा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. “देवेंद्र फडणवीस यांचा गोंधळ मी समजू शकतो. ते ज्यांच्या संगतीला आहेत त्यांना राजकारण काही कळत नाही.असा टोला राऊतांनी लगावला