
बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल
(पुणे,वृत्त सेवा ) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित डीईएस पुणे विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले. स्वायत्त विद्यापीठांनी विश्व, समाज आणि उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केले.कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज, एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ.रविंद्र आचार्य, सचिव धनंजय कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रसाद खांडेकर आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात नव्या शैक्षणिक प्रवाहांचा विचार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबत देशाच्या वैभवशाली गतकाळा विषयी विद्यार्थ्यांच्या मनात अभिमान निर्माण करणारे शिक्षण देणे अपेक्षित आहे. जगाला असलेली कुशल युवा मनुष्यबळाची गरज लक्षात घेता देशाच्या तरुण वर्गाला भाषा, कौशल्य आणि देहबोलीविषयी प्रशिक्षित करणारे शिक्षण स्वायत्त विद्यापीठांनी द्यावे. जगातील नवे शैक्षणिक प्रवाह ओळखून विद्यापीठांनी अभ्यासक्रमाची रचना करणे आवश्यक आहे.
