
आरोपीला अटक : लोणी काळभोर पोलिसांची तत्पर कारवाई, संतापाची लाट
बातमी 24तास थेऊर, (प्रतिनिधी ) पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसतानाच हवेली तालुक्यातील थेऊर येथे पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कदायक घटना मंगळवारी (दि. ५) रात्री घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ कारवाई करतआरोपीला अटक केली आहे.
श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६, रा. भीमनगर, थेऊर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पीडित चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे राहण्यासाठी आली होती.या संधीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तनकरत अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या आरडाओरडीनंतर शेजा-यांना प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तत्काळ धाव घेत मुलीची सुटका केली.यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीही कोणतीही दिरंगाई न करता पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, नसरापूर येथील अत्याचार-हत्या प्रकरण आणि पर्वतीतील अलीकडील प्रकार ताजे असतानाच पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नराधमांना कायद्याचा धाक उरला नाही का? असा सवाल उपस्थित होत असून, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.