
बातमी 24तास चाकण (अतिश मेटे) चाकण शहरातील मयूर मित्र मंडळ यंदा आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात दिमाखात प्रवेश करत आहे. अध्यक्ष संतोष शिवाजी कांडगे, उपाध्यक्ष रामस्वामी सोरटे व व्यवस्थापक गोरक्षनाथ कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा अनोखा संगम साधला जात आहे. वृंदावन – श्रीकृष्ण जीवनावर आधारित देखावा यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाने “वृंदावन – एक पावन प्रेममय आणि चिरंतन अनुभूती” हा देखावा साकारला आहे. या देखाव्यात श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग – बाललीला, कंसवध, गोवर्धन पर्वत उचलणे, रासलीला व गीता उपदेश – यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. सुंदर सजावट, हरित वातावरण व भक्तिगीतांच्या संगतीने हा देखावा भाविकांना अध्यात्मिक अनुभूती देतो आहे. रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मंडळाने सणासोबत समाजहिताचा विचार करून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मानवी जीवन वाचविण्याच्या या उपक्रमात मोलाची भर घातली.
आरोग्य तपासणी शिबीर – नागरिकांसाठी उपयुक्त उपक्रम रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तपासणी यांसह विविध चाचण्या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. रौप्य महोत्सवी उपक्रमांची श्रृंखला पर्यावरणपूरक गणेशोत्सव, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य जनजागृती, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे हे सर्व उपक्रम राबवून मंडळाने समाजसेवेची नवी दिशा दिली आहे. अध्यक्ष संतोष कांडगे यांनी सांगितले की, “श्रीकृष्णाचे जीवन हे धर्म, प्रेम व सेवाभावाचा संदेश देणारे आहे. त्याच प्रेरणेने आम्ही सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांसाठी काम करत आहोत.” नागरिकांनी श्रीकृष्ण जीवनावर आधारित देखावा, रक्तदान व आरोग्य तपासणी या तिन्ही उपक्रमांत सहभाग नोंदवून मयूर मित्र मंडळाचा रौप्य महोत्सव खऱ्या अर्थाने भक्ती, समाजसेवा व सेवाभावाचा संगम ठरवला आहे.
