
शहरात विविध संस्थांमध्ये 1000 डझन आंब्यांचे वाटप
बातमी 24तास,पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
‘‘दादा तू आला आणि कुणाला आपल्या आईची आठवण आली… तर कुणाला दूर परदेशात असलेल्या मुलांची…कुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटले… किमान आजचा एक दिवसतरी..! तुझ्याकडून अशीच लोकांची, वंचितांची सेवा घडो…असा अशिर्वाद देते..बाळा खूप मोठा हो…’’ हे हृदयस्पर्शी शब्द आहेत, एका वृद्धाश्रमातील आजीचे..! निमित्त होते आंबा महोत्सव. समाजातील दुर्लक्षित आणि निराधार व्यक्तींसोबत सण-उत्सव साजरा झाला पाहिजे. या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘‘आंबा महोत्सव’’ साजरा करण्यात आला. ‘‘गोडवा आपुलकीचा, अक्षय समाजसेवेचा’’ या संकल्पनेतून शहर आणि परिसरातील वृद्धाश्रम, अनाथाश्रम, दिव्यांग भवन, अंध शाळा असे एकाच दिवशी तब्बल 30 ठिकाणी अबालवृद्धांनी आंब्यांचा आस्वाद घेतला. 1000 हून अधिक डझन आंबे वाटप करण्यात आले. वडिलधारी मंडळी आणि समाजातून दुर्लक्षीत असलेल्या निराधारांसोबत हा सण साजरा करण्यात आला. विविध स्तरातून या उपक्रमाचे कौतूक होत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रमुख ठिकाणी आमदार लांडगे यांनी स्वत: सहभाग घेत अबालवृद्धांसोबत काही क्षण आनंदात साजरे केले. आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रत्येकाने खारीचा वाटा म्हणून सामाजिक कार्य करावे, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.